क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. सौ. सुलभाताई खोडके

  • विभागीय क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ
  • राज्यातील ८ विभागातील ५०० ते ६०० धनुर्विद्या खेळाडूंचा सहभाग

अमरावती २१ ऑक्टोबर : – अमरावतीच्या मातीतून प्रतिभासंपन्न खेळाडू घडविण्यासाठी तसेच खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी विभागीय क्रीडा संकुल, क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षणाची सोय व्हावी , यासाठी यशस्वी प्रयत्न होत असून क्रीडा लौकिकात चांगली भर पडत आहे. खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी दिली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२३-२०२४ च्या उदघाटन प्रसंगी त्याबोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, आ. प्रताप अडसड , महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रशांत देशपांडे, विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान ,आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू-तुषार शेळके,कु.अदिती स्वामी,जिल्हा क्रीडा अधिकारी-गणेश जाधव,क्रीडा अधिकारी- भालचंद्र वडते , दीपक समदुरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे थाटात उदघाटन संपन्न झाले. तसेच पुढे बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की, मैदानी खेळातून शारीरिक अभिक्षमतांचा विकास होत असून क्रीडा स्पर्धांमधून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते .म्ह्णूनच सर्व स्पर्धकांनी खेळाडू वृत्ती जोपासीत आपल्या अंगीभूत क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करून लक्षवेधी कामगिरी बजावत आपल्या जिल्ह्याचा,राज्याचा व देशाचा नावलौकिक उंचावावा, अशा शुभेच्छा देखील आमदार महोदयांनी व्यक्त केल्यात. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आपल्या मनोगतात खेळाचे उद्दिष्ट विशद करतांना यातून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागत असल्याचे सांगितले . तसेच आज संपूर्ण विश्व हे खेळांनी व्यापले असून अनेक खेळ सुद्धा लोकप्रिय झाले आहेत . त्यामुळे खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे. यासाठी जिद्द , मेहनतीतून यश प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

तर अमरावती मध्ये २१ ते २२ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ८ विभागातील १७ ते १९ वयोगटातील मुला-मुलींचे संघातून जवळपास ५०० ते ६०० खेळाडू सहभागी झाले आहेत. यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली. दरम्यान आंतराष्ट्रीय खेळाडू व प्राविण्य प्राप्त खेळाडू तसेच शिवछत्रपती पुरस्कार क्रीडापटुंचा मान्यवर अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तर यावेळी प्रामुख्याने चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करून प्राविण्यप्राप्त अमरावती येथील आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू-तुषार शेळके,नागपूर येथील ओजेस देवतळे,बुलढाणा येथील प्रथमेश जावकार, सातारा येथील कुमारी अदिती स्वामी हे खेळाडू या राज्यस्तर स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते . या उदघाटन सोहळ्याला अमरावती शहरातील खेळाडू, विद्यार्थी,, युवक-युवती,क्रीडा प्रेमी,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-क्षिप्रा मानकर यांनी तर प्रास्ताविक-विजय संतान यांनी केले.याप्रसंगी आभार प्रदर्शन-गणेश जाधव यांनी केले. यावेळी सर्व स्पर्धक, पालक,क्रीडाप्रेमी,प्रशिक्षक,मार्गदर्शक आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *