आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आदिमाया शक्तीची आराधना

  • नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे पर्व, शक्तीपर्व ! – आमदार सौ. सुलभाताई खोडके
  • नवरात्रोत्सव निमित्ताने सर्वत्र आदीशक्तीचा उत्सव आणि जागर
  • या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितां, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः ची प्रार्थना करीत घेतले आई जगदंबेचे आशीर्वाद

अमरावती( प्रतिनिधी) २३ ऑक्टोबर -नवरात्र हा देवीचा उत्सव.देवी या शब्दातच तिचे सुंदर, सालंकृत, सुवर्णाचे दागिने घातलेले स्वरूप डोळ्यासमोर येते. भारतीय संस्कृतीने योजलेला नवरात्र उत्सव अन्तरबाह्य शुद्धी करणारा आणि शक्ती वाढवणारा उत्सव आहे. शक्ती हा सर्वांच्याच श्रद्धेचा व आवडीचा विषय आहे. प्राचीन भारतीय शास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्ननेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजेच सरस्वती देवी, कर्मशक्तीच्या संपन्ननेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी देवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टीचे नामोहरम करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्री देवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे सापडेल. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवाचे पर्व संपूर्ण देशात साजरे केले जात आहे. याच शृंखलेत अमरावती येथे सुध्दा दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी श्री अंबादेवी व एकविरा देवी संस्थान येथे भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतलेत.यावेळी त्यांनी सर्व भाविकभक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देविमातेच्या चरणी प्रार्थना करीत आदिशक्तीच्या चरणी नतमस्तक होत साकडे घातले. यादरम्यान श्री अंबादेवी संस्थान व श्री एकविरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ व आई जगदंबेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यासोबतच अमरावती शहरातील विविध ठिकाणी जाऊन सार्वजनिक नवदुर्गाउत्सव मंडळाला भेट देऊन आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आदिमाया-आदिशक्तीचे दर्शन घेऊन माताराणीची यावेळी आरती केली.

तुळजापूर, माहूर, अंबाजोगाई आणि कोल्हापूर ही देवीची साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रातच आहे. तदनुसार अमरावती येथे सप्तश्रृंगी, अंबाबाई, रेणुकामाता, तुळजाभवानी यांच्या देवस्थानात ज्याप्रमाणे झान्ज, हलगी,ताशांच्या निनादात आई राजा उदे-उदे, सदानंदीचा उदे-उदे…..! चा गजर सर्वत्र केला जात असल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. जीवनातल्या प्रतिकुलतेपासून रक्षण करण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये असते. त्यामुळेच आपल्याला स्त्रीदेवता प्रामुख्याने दोन स्वरूपात दिसतात.एक तिचे वत्सल रूप असते तर दुसरे उग्र आणि संहारक रूप असते.म्हणजेच सरंक्षक आणि संहारिका या एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, तशी स्त्रीदेवतांची ही दोन रूपे आपल्याला दिसतात. ती जन्म देणारी असते म्हणून जननी असते, पण ती रक्षकही असते. त्यामुळे ‘ महिषासुरमर्दिनी’ या रूपातही आपण तिला पाहतो. महालक्ष्मीकडे आपण पोषणकर्तीच्या स्वरूपात पाहतो.महासरस्वती कलात्मक स्वरूपात पाहतो.

तिसरी महाकाली – प्रामुख्याने स्त्रीदेवतांची ही तीन रूपे आहेत. अशा प्रकारे नवरात्रात देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही रुपात असलेल्या शक्तीची सर्वत्र नित्यनेमाने दररोजच्या दररोज उपासना केली जात असल्याचे दृष्य या निमित्ताने दिसून आले.या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अखंड ज्योत,महालक्ष्मी व्रत,आदिशक्तीचा जागर,दीपमाळांसह वैविध्यपूर्ण फुलांची आरास, नयनरम्य विद्युत रोषणाई, अध्यात्मिक कार्यक्रम, रास गरब्याचा उत्साह, भजनसंध्या, प्रवचन, कीर्तनमाला, विष्णुसहस्रनाम, पूजा अर्चना, महाआरती, आदींसह विविध कार्यक्रमात सहभागी होत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. यादरम्यान अनेक नवदुर्गाउत्सव मंडळाच्या वतीने आ. सौ. सुलभाताई खोडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शक्तीची उपासना महत्वाची ठरते. नवदुर्गा उपासना व शक्ती उपासना करणाऱ्यासाठी नवरात्र हा अमृतयोग होय. पुरेशी शक्ती मिळाली आणि शक्तीचा अपव्यय न करता तिचा योग्य वापर करायची कुशलता लाभली, तर संपन्न, यशस्वी जीवनाचे स्वप्न साकार होणे अवघड ठरणार नाही. नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे पर्व, शक्तीपर्व आहे. असे प्रतिपादन करीत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना यावेळी नवरात्रोत्सव २०२३ निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते, विधिमंडळ समनवयक-संजय खोडके, यश खोडके, श्री अंबादेवी संस्थान व एकविरादेवी संस्थानचे विश्वस्त तसेच विविध सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *