श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सोने अर्पण सोहोळयात आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शिवसंस्था मासिकाचे प्रकाशन

  • शेतकरी बांधव आणि ग्रामीण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे अमूल्य योगदान-आमदार सौ. सुलभाताई खोडके
  • डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र व सोने अर्पण कार्यक्रम

अमरावती ( प्रतिनिधी) दि.२५ ऑक्टोबर – बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषी क्रांतीचे अग्रदूत डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांचे चरित्र आणि कार्य हिमालयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बहुजनांचे दुःख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी ते बॅरिस्टर होते.स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषिमंत्री होते.विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. डॉ. पंजाबराव देशमुख हे एक प्रसिद्ध भारतीय राजकारणी ,सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ होते.ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. शेतकरी बांधव आणि ग्रामीण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अमूल्य असे योगदान दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या अहिंसक चळवळीचे ते कट्टर समर्थक होते. १९५२ ते १९५७ या काळात त्यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये कृषी आणि पाटबंधारे विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. यावेळी त्यांनी भूमी सुधारणा उपायांची अंमलबजावणी आणि राज्यातील कृषी उत्पादकता सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली.१९६२ ते १९७६ पर्यंत राज्यसभेवर निवडून आल्यावर संसद सदस्य म्हणून कामकाज करताना त्यांनी कृषी, शिक्षण आणि ग्रामीण विकासावर राष्ट्रीय धोरणे तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. ते सहकार चळवळीचे खंबीर पुरस्कर्ते होते.त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम केले. समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले.त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचा वसा भारतीयांच्या पिढ्यांना आजही प्रेरणा देत आहे. कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याणासाठी त्यांचे योगदान भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांचा असा विश्वास होता की शेतकरी हा भारताच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. आणि त्यांच्या हिताचे सरंक्षण केले पाहिजे.त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास मदत केली. त्यांना आधुनिक शेती तंत्र आणि तंत्रज्ञान तसेच त्यांच्या उत्पादनासाठी एक स्थिर बाजारपेठ त्यांनी उपलब्ध करून दिली. डॉ. पंजाबराव देशमुख यांना पर्यावरणाविषयी खूप काळजी होती आणि त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि टिकाऊपणाला चालना देण्यासाठी काम केले. ते शाश्वत शेती पद्धतीचे खंबीर पुरस्कर्ते होते. आणि सेंद्रिय शेती तंत्राच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्यात अनेक राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आज सोने समर्पण निमित्ताने त्यांच्या थोर विचारांचा वसा घेऊन आपण सर्व कार्यरत राहूया,असा निर्धारपूर्ण-निश्चय व्यक्त करीत आपण डॉ. पंजाबराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करत आहोत.असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सोने अर्पण सोहळ्यात उपस्थितांना संबोधून केले. मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारे संचालित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, शिवाजी नगर येथे आयोजित सोने अर्पण सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष-हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ. सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते, विधिमंडळ समन्वयक-संजय खोडके, उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष-ऍड. गजाननराव पुंडकर, ऍड.जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष-दिलीपाबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य-हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, सुभाष बनसोड, संस्थेचे सचिव-डॉ. विजय ठाकरे, स्वीकृत सदस्य-डॉ. महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले, या सोहोळयाला प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष-हर्षवर्धन देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत केले. यावर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे ‘शिवसंस्था’ नावाचे जे त्रेमासिक होते ते आता मासिक करण्याचा संकल्प करून तो अमलात आणला आहे. या सोने अर्पण सोहोळा निमित्ताने सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते शिवसंस्था या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत सर्व मान्यवर अतिथींच्या वतीने पुष्पचक्र व सोने अर्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. यासोबतच कार्यक्रमादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट, अमरावती येथील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थीच्या शहरी-ग्रामीण-वैद्यकीय कार्यक्रम, उपक्रम, अभियान अंतर्गत तसेच विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम स्थळी भेट देण्याकरिता उपयुक्त अशा ४४ सीटर्स बसचे याप्रसंगी आ. सौ. सुलभाताई खोडके व संस्थेचे अध्यक्ष-हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले.या सोहोळयाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य,प्राचार्य,प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक तसेच शिव परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन-प्रा. डॉ. मनीष गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *