वलगांव रोड स्थित जिल्हा परिषद विद्योचीत माध्यमिक शाळा येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचे नियोजन

आ. सौ. सुलभाताई खोडके यांची जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस

अमरावती ३० जानेवारी : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सर्व शासकीय शाळांचा दर्जा सुधारून, त्या ठिकाणी श्रेणीवाढ, चांगल्या शैक्षणीक व भौतिक सुविधा उपलब्ध करून समाजातील प्रत्येक गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न चालविले आहे. महापालिकांच्या शाळेमध्ये केजी वन व टू , इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग, तसेच दहावी व बारावी पर्यंतचे शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्या नंतर आता वलगांव रोड मार्गावरील जिल्हा परिषद (मा. शा) विद्योचीत माध्यमिक शाळेचा सुद्धा कायापालट होत आहे. या शाळेमध्ये नुकतेच ३५ लक्ष रुपये मंजूर करून अभ्यासिका सुरु करण्यात आली असून आता शहराच्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे सुलभ व सोयीचे व्हावे म्ह्णून वलगांव रोड स्थित जिल्हा परिषद विद्योचीत माध्यमिक शाळा येथे वर्ग अकरावी व बारावी चे शिक्षण सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली आहे. शहराच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद विद्योचीत माध्यमिक शाळा येथे दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते , परिसरातील अल्पसंख्यांक बहुल भाग व आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. मात्र दहावी नंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना शहरातील मध्यभागात असलेल्या खासगी महाविद्यालयाकडे वळावे लागते . मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना महागडे शिक्षण घेणे कठीण बनले आहे. तसेच त्यांचे वास्तव्याचे ठिकाण सुद्धा शहरापासून लांब अंतरावर असल्याने त्यांना जाणे -येणे सुद्धा करणे गैरसोयीचे ठरत आहे.

वलगांव रोड स्थित जिल्हा परिषद विद्योचीत माध्यमिक शाळा येथे चांगल्या शैक्षणीक सुविधा, वर्ग खोल्या, मनुष्यबळ, भौतिक सुविधा व परिसर, अभ्यासिका आदी उपलब्ध असून त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय वर्ग अकरावी व बारावी विज्ञान व कला शाखेचे महाविद्यालय जर उर्दू व इंग्रजी माध्यमांमध्ये सुरु झाल्यास चांगले कनिष्ठ महाविद्यालय चालू शकते व शाळेला सुद्धा विद्यार्थी उपलब्ध होऊन अल्पसंख्यांक व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेणे सोयीचे होईल, या बाबत सुद्धा आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अविशांत पंडा यांना पत्राद्वारे अवगत केले. तसेच सदर कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून आगामी शैक्षणीक वर्षांपासून याबाबतचे नियोजन करण्या संदर्भात देखील आमदार महोदयांनी जिल्हा परिषद सीईओंशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या संदर्भात सीईओ अविशांत पंडा यांनी सकारात्मता दर्शविली असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला यासंदर्भात नियोजन व कार्यवाही करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहे.त्यामुळे आता लवकरच वलगांव रोड स्थित जिल्हा परिषद विद्योचीत माध्यमिक शाळा येथे अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षक सुरु करून तेथे कनिष्ठ महाविद्यालय सुरु होण्याच्या मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *