परिचय मेळाव्यातून वैवाहिक जीवनात येईल विचारांची परिपक्वता – आ. सौ. सुलभाताई खोडके…

  • राठोड तेली समाजाच्या ‘शुभमंगल’ परिचय पुस्तिकेचे विमोचन व मेळावा
  • जय संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन

विवाह म्हणजे केवळ दोन वधू-वरांच्या नवीन आयुष्याची सुरुवात नसून दोन कुटुंब, नातेवाईक यांचा मेळ आहे. आजच्या नवीन पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती केली असली तरी विवाहाचा प्रश्न व सुखी संसार करणे एक आव्हान उभे ठाकले आहे. योग्य जोडीदारांची निवड न झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होतात. रथाची चाके जशी व्यवस्थित चालली पाहिजे. तसे सुखी वैवाहिक जीवनासाठी दोघांचे विचार पटणे आवश्यक आहे. सुखी संसार करत असतांना दोघात खटके उडणे व रुसवे-फुगवे चालतंच असतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा संवाद, सुसुत्रता व थोडी तडजोड करण्याची सुद्धा नवीन पिढीची तयारी असली पाहिजे. यासाठी दोघांचे विचार पटणे महत्वाचे असून ही विचारांची परिपक्वता परिचय संमेलनातून निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ. सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले.

जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था अमरावती च्या वतीने राज्यस्तरीय तेली उपवर – वधू परिचय महामेळावा आज 10 फेब्रुवारी रोजी स्थानिक जुना बायपास मार्ग स्थित मनोर मांगल्य मंगल कार्यालय येथे मोठया थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजय रामेश्वरजी लेंधे, तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व श्री. शंकररावजी हिंगासपुरे, शंकररावजी श्रीराव, रामेश्वरजी गोदे, उत्तमरावजी नाडे, अण्णासाहेब नालसे, माणिकराव राऊत, नंदकुमार खोडे, वसंतराव जामोदे, मनोहरराव ईचे, ऍड. वासुदेवराव माहोरे, विष्णूपंत मेहरे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या शुभ हस्ते “शुभमंगल “पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या व समाज बांधवांच्या वतीने आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण ईचे यांनी केले. यावेळी राठोड तेली समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *