महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन; ढोलताशासह सुप्रसिद्ध सिनेगायक सुदेश भोसले यांच्या गायनाने महोत्सवाचा शुभारंभ

अमरावती, दि. 18 : महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपल्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परपंरा व संस्कृती तरुण पिढीपर्यंत पोहोचवून त्यांची जोपासना करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि.18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत सायन्स स्कोर मैदानावर महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खासदार नवनीत कौर म्हणाल्या की, महाराष्ट्राची साहित्य, कला, परपंरा व संस्कृतीची जपवणूक व्हावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लुप्त होत चाललेली परंपरागत कलागुण, कौशल्य, आदिवासी कला, संस्कृती तरुण पिढीच्या स्मरणात राहून संस्कृतीची जपणूक होण्यास आपसूकच मदत होईल. या महोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना आपल्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये आदिवासी समाजातील लुप्त होत चाललेल्या कला,परंपरा, लोककलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अमरावती जिल्हाचा सांस्कृतिक जिल्हा म्हणून नावलौकिक आहे. त्यामुळे कलाकारांनी आपली कला येथील स्थानिक, तरुण पिढीपर्यंत पोहोचवावी. समस्त जिल्हावासियांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले.

महोत्सवाचा प्रारंभी रुद्रवतार ढोलताशा पथकाच्या सादरीकरण केले. त्यानंतर कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाला. सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी मराठी आणि हिंदी सदाबहार गीतांचा सुरेल कार्यक्रम सादर केला. या मैफिलीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. रसिक प्रेक्षकांच्या दिलेल्या प्रतिसादामुळे उद्घाटन सोहळा लक्षवेधी ठरला.

महासंस्कृती महोत्सवात 22 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी

उद्या, सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती निमित्त स्थानिक कलाकारांव्दारे पोवाडा आणि इतर शिवजयंती विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतील. सायंकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत ‘गर्जा महाराष्ट्र’ संगीत कार्यक्रम हृषिकेश रानडे आणि सहकलाकार सादर करतील. मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 7.30 वाजता स्थानिक कलाकारांव्दारे जागर लोककलेचा कार्यक्रम होईल. यामध्ये दंडार, एकांकिका, देशभक्तीपर व मनोरंजनात्मक गाणी सादर केल्या जाईल. रात्री 7.30 ते 10 वाजेपर्यंत ‘महाराष्ट्राची लोकधारा , महाराष्ट्राची संस्कृती ‘ दर्शविणारा कला अविष्काराचा कार्यक्रम सादर करण्यात येईल. बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 5 ते 7.30 वाजता स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमात मेळघाट नृत्य, कोरकू, लोकनृत्य, भारूड पारंपारिक कला सादर करण्यात येईल. यानंतर सायंकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत मराठी व हिंदी गाण्याचा संगीत कार्यक्रम सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे सादर करतील. गुरुवार दि. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनपटावर यांच्यावर आधारित महानाट्य ‘संविधान’ सादर करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविकातून दिली.

महोत्सवाच्या ठिकाणी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्थानिक कलाकारांचे विविध बहारदार कार्यक्रम सादर होतील. तसेच शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. विशेष आकर्षण म्हणून बचतगटांचे प्रदर्शन व खाद्य संस्कृतीचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *