अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा ९८५.४९ कोटीच्या योजनेला केंद्र सरकारने दिली मंजुरी

  • आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रुती
  • केंद्र सरकारचे मानले आभार.. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे अभिनंदन

अमरावती २० जानेवारी : – अमरावती शहराला वर्ष २०५५ पर्यंत नियमित व मुबलक जलापूर्ती करण्याचा दृष्टीकोन बाळगून अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केंद्र पुरस्कृत अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा ९८५.४९ कोटीच्या योजनेचा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिकाच राबविली. दरम्यान अधिवेशनातही वारंवार मुद्दा उपस्थित करून योजना मंजूर करण्याबाबत शासनाने कार्यवाही करण्यासह यातील तांत्रिक अडचणी सुद्धा दूर करण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले होते. याची फलश्रुती म्ह्णून आता अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा ९८५.४९ कोटीच्या योजनेला केंद्र सरकारच्या शिखर समितीने मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आता लवकरच योजनेच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाई पर्यंतची डब्लूटीपी पाईप लाईन जुनी लोखंडी असून शिकस्त झाली आहे. या गुरुत्व वाहिनीचे ३० वर्षाचे आयुष्यमान सन २०२४ मध्ये संपुष्ठात येत आहे. दरम्यान या वारंवार गळती लागत असल्याने दुरुस्तीच्या कामांना चार -पाच दिवस लागत असल्याने नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत गैरसोय निर्माण होते. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण होते . म्ह्णून अमरावती शहरासाठी नियोजित पाणी पुरवठा होणे गरजेचे असल्याने अमरावतीला वर्ष २०५५ पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्तीची दूरदृष्टी बाळगून अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत २.० अभियाना अंतर्गत सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी ते पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंथरणेचा प्रस्ताव ९८५.४९ कोटीच्या प्रकल्पाला मान्यता मिळण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला . दरम्यान गेल्या मार्च २०२३ च्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करतांना या योजनेला प्रस्ताव कशी मान्य करणार ? असा प्रश्न लावून धरीत शासनाचे लक्ष वेधले होते . यावर मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने सभागृहात निवेदन देतांना मंत्री ना.उदय सामंत यांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समिती पुढे हा प्रस्ताव सादर करून केंद्र शासनाकडे शिफारस करणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. दरम्यान आमदार महोदयांनी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना सुद्धा अवगत केले व अमरावतीची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सदर प्रकल्प पूर्णत्वास आणण्याची आवश्यकता असून शासनाने याबाबत जलद कारवाही करावी अशी मागणी व विनंती सुद्धा केली.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी याबाबत राज्य स्तरीय उच्चाधिकारी समितीचे प्रमुख तथा राज्याचे मुख्य सचिव यांना आपल्या दालनात बोलावून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या संदर्भातील कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून केंद्र सरकारकडे शिफारस करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना मुख्य सचिवांना केल्या होत्या. त्याअनुषंगाने गेल्या ५ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची बैठक झाली असता अमृत २ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली व एकूण ९८५.४९ कोटींच्या अमृत २ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजने अंतर्गत केंद्र शासन ३२८.४८ कोटी इतका भार उचलेल व उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून खर्च करून हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे. असा निर्णय घेऊन राज्य उच्चाधिकार समितीच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली. दरम्यान याबाबत लवकरच कार्यवाही अपेक्षित असतांना काही तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रकल्पाच्या मान्यतेबाबत विलंब लागत असल्याने आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी नुकत्याच गेल्या ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा ९८५.४९ कोटीच्या योजनेच्या मान्यतेसाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, या मागणीचा पुनर्रोच्चार करीत सभागृहाचे लक्ष वेधले होते.

अशातच केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मागील १० जानेवारी २०२४ रोजी नगरविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर प्रकल्पाला मान्यता प्रदान केली होती. त्यामुळे पुढील कार्यवाही जलद पूर्ण होऊन लवकरच केंद्र शासनाची शिखर समिती अमृत २ अभियान अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देईल, अशा विश्वास व्यक्त करण्यात येत असल्याने आता लवकरच योजनेच्या कामांना सुरुवात होणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आता केंद्र सरकारच्या शिखर समितीने सुद्धा केंद्र पुरस्कृत अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ९८५.४९ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली असल्याने आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येणार असून अमरावती शहराला वर्ष २०५५ पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्तीची व्यवस्था होणार असल्याने अमरावतीला नवी जलसंजीवनी मिळाली आहे. याबाबत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे . तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *