मातृतीर्थाप्रमाणेच अमरावतीमधील जिजाऊ सृष्टी शिवप्रेमींचे प्रेरणास्थान-आ.सौ. सुलभाताई खोडके

आरटीओ जवळील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती २२ फेब्रुवारी :- महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे खऱ्या अर्थाने स्वराज्य आणि सुराज्य निर्मितीचे स्फूर्तिस्थान आहे. महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य ऐतिहासिक वारसा जेथून सुरू होतो ,अशा मातृतीर्थ प्रमाणे अमरावती मध्ये सुद्धा जिजाऊ स्मारक साकारण्यात यावे, अशी शिवप्रेमींची इच्छा होती. याच धर्तीवर आता अमरावतीमध्ये जिजाऊ सृष्टी साकारण्यात आली आहे. अमरावती शहराला अभिमान वाटावा असे स्मारक साकारण्यात आले असून जिजाऊंच्या मूर्तीतील जिवंतपणा हा सौंदर्यीकरणातून प्रतिबिंबित होत आहे. त्यामळे मातृतीर्थाप्रमाणेच अमरावतीमधील जिजाऊचे अद्भुत स्मारक हे शिवप्रेमींचे प्रेरणास्थान बनले असल्याचे गौरवोद्गार आ.सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले.

आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत २४ लक्ष निधीतून आरटीओ कार्यालयाजवळील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले. अमरावती शहराच्या वैभवात व लौकिकात विशेष भर घालणाऱ्या या अद्भुत व नेत्रदीपक प्रेरणास्थळाचा अलौकिक व नेत्रदीपक लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानिक आरटीओ जवळील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक येथे थाटात पार पडला . यावेळी शिवमती आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अश्विन चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ,प्रवक्ता तथा विधीमंडळ समन्वयक शिवश्री संजय खोडके , मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री अरविंद गावंडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती हर्षा ढोक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी , अधिक्षक अभियंता रूपा राऊळ गिरासे ,कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांसह सर्व उपस्थित शिवप्रेमींनी जिजाऊ वंदन करून माँसाहेबांना मानाचा मुजरा अर्पण केला. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक समिती ,अमरावती च्या वतीने सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले.

पुढे बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की शहरात पायाभूत सुविधांची पूर्तता होत असतांना चौकांच्या सौंदर्यीकरणावर सुद्धा आपला विशेष भर आहे. शहरातील अनेक चौक हे सौदर्यीकरण , सुशोभीकरण, हिरवळ व लख्ख प्रकाशाने खुलून दिसत आहेत .यातून शहराला नवी ओळख निर्माण होणार असल्याने स्वच्छ व सुंदर अमरावतीची संकल्पना सुद्धा प्रत्यक्षात साकारली असून आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राहण्याचा मानस आमदार महोदयांनी यावेळी व्यक्त केला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रकाश राऊत यांनी जिजाऊ स्मारकाच्या संदर्भातील घडामोडींबाबत माहिती दिली. या स्मारकाला लोक दुरून दुरून भेट देत असतांना आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी देऊन वीरमातेचा सन्मान केला आहे. ही बाब सर्वासाठी अभिमानाची असून हे आम्ही कधीही विसरणार नसल्याचे सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अश्विन चौधरी यांनी जिजाऊ स्मारकावर आता अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन होणे आवश्यक असून यातून समाजाला नवी दिशा मिळणार असून याचे जतन करणे ही आता सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. दरम्यान शिवजयंती निमित्य शिवटेकडी तेथे आयोजित वत्कृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा मधील प्रथम , द्वितीय व तृतीय तसेच दोन प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त स्पर्धकांचा आ. सौ.सुलभाताई संजय खोडके व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिजाऊ स्मारकाचे सुशोभीकरण, रायगडासारखी मेघडंबरी तसेच परकोटाप्रमाणे तयार करण्यात आलेली भिंत असे अद्भुत सौंदर्यीकरण करण्यात विशेष कार्य करणारे कंत्राटदार वृषभ राऊत यांचा सुद्धा आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पल्लवी यादगिरे यांनी केले. यावेळी शिवश्री यश खोडके, शिवमती-मयूराताई देशमुख,संजय ठाकरे, प्रा. प्रफुल्ल गुडधे ,सोपान साबळे , राम बावस्कर , चंद्रकांत मोहिते , निलेश सोनटक्के ,प्रमोद गावंडे , प्रा .अंजली ठाकरे , अंजली राऊत ,आरती बोंदरकर , सुनील खांडे , प्रा. मनाली तायडे, वृषभ राऊत , मनीष पाटील, ऋतुराज राऊत , आदींसह राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक समिती अमरावतीचे पदाधिकारी तसेच सर्व शिवश्री, शिवमती व शिवप्रेमी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी श्रीशिवसाम्राज्य ढोल ताशा व ध्वज पथक अमरावती द्वारे केलेले गगनभेदी ढोल वादन , स्मारकावरील नेत्रदीपक रोषणाई, धनश्री सामाजिक व सांस्कृतिक संस्था द्वारे सादर नृत्य , अश्या अनेक प्रसंगांमुळे संपूर्ण परिसर जिजाऊ -शिवमय झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *