अमरावती मध्ये नागरी भागात मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी ५० कोटींचा निधी मंजूर

आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सुचविलेल्या विकास कामांना शासनाकडून मान्यता

अमरावती १५ मार्च : – अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिकाच राबविली असल्याने मागील चार वर्षांपासून शहरात विकासाचे पर्व नांदताना दिसत आहे. स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह शहरात शैक्षणिक सुविधा ,शहर सौंदर्यीकरण , विविध लाभांच्या योजनांची अंमलबजावणी यासह आरोग्य सुविधा ,क्रीडा सुविधांच्या पूर्ततेतून मानव विकास देखील साधला जात आहे. अमरावतीच्या विकासाचे व्हिजन मांडून व त्यासाठी नियोजन कृती आराखडा तयार करून विकास कार्यक्रम राबविण्यासाठी तत्पर भूमिका घेत आमदार महोदयांनी अमरावतीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्ते विकास, मूलभूत सोयी-सुविधा, अल्पसंख्यांक विकास, मागास वर्गीय विकास व योजना, पर्यटन विकास, आरोग्य व वैद्यकीय सेवा, क्रीडा सुविधांची निर्मिती आदींसह विकासाचे अनेक प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने अमरावतीच्या विकासाचे चक्र अधिक गतिमान झाले आहे. अशातच आता अमरावती महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या नागरी सेवा पुरविण्यासाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात शासनाच्या नियोजन विभागाने १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सुचविलेल्या विकास कामांच्या यादीला मंजुरी दिल्याने अमरावती नागरी भागात शाश्वत विकासाला बळकटी मिळणार आहे. या निधी अंतर्गत प्रभागा – प्रभागांमध्ये रस्त्यांचे बांधकाम, सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी नालीचे बांधकाम, सार्वजनिक खुल्या मैदानांना चेनलिंग फेन्सिंग, सौंदर्यीकरण, रस्त्याच्या दुतर्फ़ा पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मनपा बगीचांचे नूतनीकरण, शेड व सभागृहाचे बांधकाम, अशी नागरी विकासाची कामे करण्यात येणार आहे.

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत अमरावती शहरासाठी ३ कोटी मंजूर

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत वर्ष २०२३ – २४ मध्ये अमरावती शहरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या पर्यटन विकास व सांस्कृतिक कार्य विभागाने आदेश निर्गमित करून पर्यटन संचालनालयास निधी वितरित करण्यास देखील मान्यता दिली आहे. या निधीमधून शहरातील धार्मिक स्थळ व मंदिरांच्या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत अमरावती शहरातील संत गजानन महाराज मंदिर कांता नगर येथे सौंदर्यीकरण करणे व विलास नगर येथील मंदिराला शेडचे बांधकाम व सौंदर्यीकरण करणे तसेच श्रीहरी नगर (अर्जुन नगर ) अमरावती येथे प्रवेश द्वार उभारण्यात येणार आहे. तसेच संत गजानन महाराज मंदिर कुंभारवाडा, श्री. हनुमान मंदिर, न्यु हनुमान नगर व साई मंदिर, मोहन नगर येथे सभागृहाचे बांधकाम व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. शहर विकासाच्या शृंखलेत मंदिर व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याला घेऊन भरीव निधीची पूर्तता झाल्याने शहराच्या धार्मिक वैभवाचे जतन होऊन पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

आंचार संहितेतही सुरु राहणार विकासाची शृंखला – आ. सौ. सुलभाताई खोडके

सद्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आंचार संहिता कुठल्याही वेळी लागू शकते. त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रम न घेता थेट विकास कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेली विकास कामे आंचार संहितेतही सुरु राहणार आहे. सदर कामे ही गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्यासह नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आले असून आंचार संहितेतही अमरावतीमध्ये विकास पर्व नांदणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *