नागरिकांनी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करून निसर्गाचे संवर्धन करणे अपेक्षित – संजय पाटील

रासायनिक रंगाचा वापर करू नका, पाण्याचा अपव्यय टाळा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करा असे सामाजिक संस्था, संघटना वा प्रदुषण नियंत्रण मंडळाने कितीही आवाहन केले तरी रंगपंचमीच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर अपरिहार्य मानला जातो. नागरिकांच्या या गैरसमजाला छेद देण्यासाठी दि. 14/3/2024 विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडेश्वर च्या ग्रीन आर्मी क्लब च्या वतीने‘नैसर्गिक रंग’ बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून श्री संजय पाटील प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अमरावती तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री नंदकिशोर गांधी संचालक कामधेनु प्राकृतिक केंद्र अमरावती, प्राचार्य डॉ. अलका भिसे , ग्रीन आर्मी क्लबच्या डॉक्टर सुचिता खोडके, डॉ. गजेंद्र सिंग पचलोरे , कू.योगिनी मते हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली. आपल्या प्रास्ताविक दरम्यान डॉ. सुचिता खोडके यांनी ग्रीन आर्मी क्लब ची भूमिका विशद केली आणि या क्लबच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध पर्यावरण पूरक कार्यक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय डॉ पचलोरे यांनी केला. यानंतर या कार्यशाळेचे उद्घाटक श्री संजय पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल याबद्दल माहिती तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परिसर प्लास्टिक फ्री करण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी श्री नंदकिशोर गांधी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना विविध नैसर्गिक वस्तूंची माहिती देऊन आपणही छोट्या छोट्या नैसर्गीक गोष्टीतून रोजगार मिळवू शकतो असे सांगीतले . त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या काही सॅम्पल च्या माध्यमातून स्वतः उद्योजक कसे होता येईल यावर प्रकाश टाकला. या करीता कामधेनु प्राकृतिक केंद्र अमरावती व ग्रीन आर्मी क्लब यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ. अलका भिसे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली. विद्यार्थी दशेत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजावेत म्हणून मातीचे गणपती बसावा अभियान, होळीनंतर उरलेल्या गोवऱ्या व राखेपासून खत तयार करणे असे उपक्रम महाविद्यालय राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात बीएससी भाग तीन च्या विद्यार्थिनींनी नैसर्गिक रंग कसे तयार करावे प्रात्यक्षिकांसह सांगीतले. कु वैष्णवी घावत, कू नयना कू लिना घोडेस्वार, कू अश्विनी तिरमारे या विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या नैसर्गिक वस्तू व फुलांपासून नैसर्गिक रंग कसे तयार होतात याची माहिती दिली.त्यात गुलाबापासून गुलाबी रंग, निळ्या पत्तकोबी किंवा निळ्या जास्वंदापासून निळा रंग, झेंडु किंवा हळदीपासुन पिवळा, गुलाब, बीट, जास्वंद फुल तसेच रक्त चंदनापासून लाल रंग, पालेभाज्या, गव्हाचे तृण, कस्तुरी मेहंदी यापासून हिरवा, पळसाच्या फुलापासून सतरंगी, चहापत्ती वा कॉफीपासून तपकिरी, आवळा पावडर तसेच कस्तुरी मेंहदी रात्रभर भिजवुन काळा रंग तयार करता येत असल्याचे सांगितले. आपल्या प्रात्यक्षिकांमध्ये विदयार्थ्यांना रंग तयार करुन दाखविले. यावेळी सर्व विदयार्थ्यांना पर्यावरण पूरक रंगपंचमी खेळण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत डॉ. शेवतल राठी त्वचा रोग तज्ञ यांनी आपल्या व्हिडिओ द्वारा नैसर्गिक रंगाचे महत्व समजावून दिले. तसेच रासायनिक रंगामुळे कोणकोणते त्वचा रोग होऊ शकतात याची माहिती दिली. रंगपंचमी खेळताना काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली.

यावेळी डॉ राठी यांनी पर्यावरण पूरक रंगपंचमी खेळण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा महल्ले तसेच आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील तिनखेडे यांनी केले. या कार्यशाळेला वाणिज्य व विज्ञान शाखेचे विदयार्थी उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता डॉ गजेंद्र सिंग पचलोरे, प्रा शिलानंद हिवराळे, डॉ सुबोध बनसोड, डॉ नमिता सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *